About Us
मंडळी राम राम!
आज आपण माझ्या या ब्लॉगवर आलात, आनंद
वाटला. आपलं स्वागत आहे.
माझ्या ब्लॉगच्या
नावाप्रमाणेच या ब्लॉगवर तुम्हाला सगळचं "आगळं! वेगळं!!!" दिसेल. त्याचं
कारण आहे की, माझ्या
मनात जसे विविध विचार मुक्तपणे संचार करीत असतात, त्याप्रमाणे
मी त्यांना या माझ्या हक्काच्या व्यासपीठावरून वाट करून देत असतो.
आणि त्यामुळेच तुम्हाला येथे कधी दिसतील, विनोदी किस्से, वात्रटिका, टोलेबाजी तर कधी मानसिक तणावाबाबत लेख तर कधी ब्लॉग विषयी टिप्स, तर केव्हा टेलिकम्युनिकेशन, मोबाईल विषयीचे लेख
असचं केव्हाही आणि काहीही.
विचारांचा संकोच करायचा नाही आणि कोणत्याही विषयांना कसल्याही
चौकटीच्या बंधनात बांधून ठेवायचं नाही हा माझा स्वभाव.
माझ्या मनात विचार जसे मुक्तपणे येतात तसेच ते येथे मी व्यक्त करत
जाणार. मी कोणी साहित्यिक नाही. मी आहे फक्त मनातील विचार व्यक्त करणारा एक
सामान्य माणूस.
येथे व्यक्त होत असलेले
विचार सहज, नैसर्गिक
आणि मुक्त आहेत इतकचं मला माहित आहे. मी त्याला कोणत्याही साहित्यप्रकाराच्या
चौकटीत बसविण्याचा विचारही करत नाही. आता याला कोणता साहित्यप्रकार म्हणायचा हा
ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण मनातल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी ब्लॉग इतकं मस्त दुसरं
व्यासपीठ नाही असं माझं मत आहे. येथे लेखक, संपादक, टाईपसेटर, प्रूफरीडर, प्रकाशक सबकुछ आपणच. कुणीही आपल्या लिखाणाला नकार देण्याचं कारणच नाही.
मनात येईल ते बिनधास्त लिहीत रहायचं, अगदी संपूर्ण
विश्वात वाचलं जाण्याच्या शक्यतेबरोबर.
कुणी माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंदच आहे. नाही
दिल्या तरी माझा लेखनप्रवास सुरूच राहील. धन्यवाद!