2015 | आगळं! वेगळं !!!

अमेरिकन व्हॉटसअॅपला पर्याय भारतीय जिओ चॅट

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटचा लोगो

व्हॉटसअॅप अॅप इन्स्टॉल केलेले नसेल असा स्मार्टफोन विरळाचं. जवळपास सगळ्या स्मार्टफोनवर हे अॅप आढळून येईल. या अॅपची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या स्पर्धेत इतरही काही वुई चॅट, लाईन, हाईक, चॅटऑन इत्यादी सारखी अॅप्स उतरली, पण ती काही व्हॉटसअॅप इतकी लोकप्रियता मिळवू शकली नाहीत. त्यामुळे आजही व्हॉटसअॅप ची मोहिनी कायम आहे.  

आता रिलायन्सने व्हॉटसअॅप सारखेच आपले एक भारतीय अॅप JIO Chat या नावाने गुगल प्लेवर उपलब्ध केले आहे. व्हॉटसअॅप प्रमाणेच हे एक फ्रेंडस अँड फॅमिली नेटवर्किंग अॅप आहे.  व्हॉटसअॅप आणि JIO Chat मधील एक महत्वाचा फरक म्हणजे JIO Chat हे शंभर टक्के मोफत आहे. व्हॉटसअॅप हे एक वर्षापर्यंत मोफत वापरता येते त्यानंतर मात्र सुमारे पंचावण्ण रुपये प्रतिवर्षी त्यासाठी मोजावे लागतात. यासोबतच JIO Chat मध्ये व्हॉटसअॅपपेक्षा अधिक काही नविन वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत.

  • यामध्ये टेक्स्ट मेसेज सोबत मल्टिमिडीया फाईल्स ऑडिओ, व्हिडीओ, इमेजेस तर पाठविता येतातच, पण Document फाईल्सही शेअर करता येतात.
  • यामध्ये इमोशन्स, डूडल्स, स्टिकर्स शेअर करता येतात.
  • यामध्ये व्हाईस व व्हिडिओ कॉलींग तसेच ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
  • यामध्ये बातम्या, क्रिडा आणि मनोरंजनासाठी Firstpost, Moneycontrol, Cricketnext, IBNlive, MTvIndia असे अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत.
  • यामध्ये ग्रुप तयार करताना आता सभासदांच्या संख्येची अडचण येणार नाही, कारण यात ग्रुप मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.

व्हॉटसअॅप मधील सगळ्या फीचर्स पेक्षा काही अधिक आणि वेगळ्या अश्या फीचर्सने भरलेले हे अॅप  फ्री आणि अॅड फ्री सुध्दा आहे. 

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅट आणि व्हॉटसअॅपमधील फीचर्सचा तुलनात्मक तक्ता

http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स


http://nathtel.blogspot.com/
जिओ चॅटमधील फिचर्स

विशेष म्हणजे अमेरिकन व्हॉटसअॅप वापरण्याऐवजी स्वदेशी JIO Chat वापरा. आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अमेरिकेला जाणारे आपले कोट्यावधी रुपये वाचवा असे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मिडीयातून व्हायरल होत आहेत.

आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी व्हॉटसअॅप ऐवजी JIO Chat वापरायला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही.

फक्त मला काय त्याचे? आणि मी एकट्याने बदल करुन काय फरक पडणार आहे? असा नकारार्थी विचार न करता, मी स्वतः बदलले आणि माझ्या ओळखीच्या लोकांनाही बदलायला सांगितले अशी भूमिका प्रत्येकाने घेतली तर या विचाराचे एका चळवळीत रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.

JIO Chat गुगल प्लेवर सर्च करुन डाऊनलोड करुन घ्या अथवा येथून करा.

आवश्यक अॅप; कॉल रेकॉर्डर


http://nathtel.blogspot.com/

आपल्याला आलेल्या किंवा आपण इतरांना केलेल्या कॉल्स मध्ये नेमके काय संभाषण झाले होते याचे रेकॉर्डिंग असणे काही प्रसंगी फार गरजेचे व उपयुक्त ठरते. त्या कॉल रेकॉर्डिंगवरुन प्रत्यक्ष काय संभाषण झाले होते याचा पुरावा आपल्या जवळ उपलब्ध होतो. आणि त्याचे अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात.

उदा. कोणी एखादी व्यक्ती त्रास देण्याच्या हेतूने सतत कॉल करत असेल, बिझनेस मध्ये एखादे डील कोणत्या रेटमध्ये फायनल झाले होते याची माहिती पाहिजे असेल, किंवा तुम्ही एका मित्रास एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यावर त्याने काय सबब सांगितली होती याची त्याला आठवण करुन द्यायची असेल तर अशावेळी या कॉल रेकॉर्डिंगचा उपयोग होतो. श्या एक ना अनेक गोष्टींसाठी पुरावा म्हणून उपयोगी ठरणारे कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डींग अॅप असणे अतिशय गरजेचे आहे.

गुगल प्ले वर तसे अनेक कॉल रेकॉर्डींगचे अॅप्स उपलब्ध आहेत. पण त्यापैकी Call Recorder - ACR NLL निर्मित अॅप वापरुन पहायला हरकत नाही. हे एक चांगले मोफत कॉल रेकॉर्डिंग अॅप आहे. या अॅपद्वारे फोनवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे, तसेच फोनवरुन केल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉलचे आपोआप रेकॉर्डिंग केले जाते.

आपणांस ज्या क्रमांकांच्या कॉल्सचे रेकॉर्डिंग होऊ नये किंवा ते होण्याची आवश्यकता नाही असे वाटत असेल तर, हवे ते क्रमांक यातून वगळण्याची सुविधा यांत उपलब्ध आहे. ही सुविधा येणाऱ्या व फोनवरुन केल्या जाणाऱ्या अश्या दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी आहे. कॉल्सचे होणारे रेकॉर्डिंग जतन करण्यासाठी विविध फाईल फॉरमॅटचे पर्याय सुध्दा यात आहेत.

याची फाईल साईज 5.9 MB आहे.

'नामा' ही जाहला परका





घुमान संमेलनाच्या वेळी
हालत नव्हते
तुमच्या 'नामां'शिवाय 
आमच्या पेपरचे पान

संपन्न झाले संमेलन
विसरलो आम्ही घुमान
आज होता म्हणे तुमचा 
665 वा संजीवन समाधी सोहळा

पण तुमच्या स्मरणांसाठी
रिकामा नव्हता हो
पहिल्या पानावरचा
एकही कोपरा

'राँधे माँ' साठी मात्र
जागा ठेवा बरं का
माध्यमांसाठी आता
'नामा' ही जाहला परका

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


http://nathtel.blogspot.com/
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज



नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लाऊ जगी।


असा भक्तिचा संदेश देत

भागवत धर्माची पताका

संपूर्ण भारतभर फडकविण्याचे

अलौकिक कार्य करणाऱ्या

संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा

आज संजीवन समाधी सोहळा.

त्यानिमित्त संत शिरोमणी

श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!




विंडोज 10 च्या ISO फाईलवरुन बूटेबल मिडीया तयार करणे



विंडोज 10 ची ISO फाईल आपण डाऊनलोड करुन घेतलेली आहे. विंडोज 10 थेट कसे डाऊनलोड करायचे हे आपण याआधीच पाहिलेले आहे. आता आपण डाऊनलोड करुन घेतलेली ही विंडोज 10 ची ISO फाईल म्हणजे डिस्क इमेज या स्वरुपातील फाईल असते. या फाईलवरुन आपल्याला विंडोज 10 थेट संगणकावर स्थापित करता येत नाही. त्यासाठी त्या फाईलवरुन बूटेबल मिडीया उदा. युएसबी पेनड्राईव्ह किंवा डिव्हिडी तयार करावी लागते.

ISO फाईलवरून बूटेबल मिडीया बनविणे ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. थोडक्यात ड्रॅग अँड ड्रॉप अँड क्लिक अशा स्वरुपाची ही प्रक्रिया आहे. त्यासाठी आपणाकडे विंडोज 10 ची ISO फाईल, बूटेबल मिडीया मेकर प्रोग्रॅम आणि 4 जीबी पेक्षा अधिक क्षमतेचे युएसबी पेनड्राईव्ह किंवा डिव्हिडी अशा स्वरुपाचे माध्यम असणे आवश्यक आहे. 

युएसबी पेनड्राईव्ह 4 जीबी क्षमतेचा असला तरी प्रत्यक्षात त्याची क्षमता 4 जीबी पेक्षा कमीच असते हे लक्षात घ्यावे, त्यामुळे किमान 8 जीबी क्षमतेचा तरी पेनड्राईव्ह असावा. तसेच डिव्हीडीपेक्षा युएसबी पेनड्राईव्ह अधिक गतीमान माध्यम आहे, असे मत काहीजण व्यक्त करतात. येथेही आपण  युएसबी पेनड्राईव्हचाच विचार केलेला आहे. पण डिव्हिडी काय किंवा युएसबी पेनड्राईव्ह काय माध्यम कोणतेही वापरले तरी काही फरक पडत नाही. आपल्याकडील उपलब्धतेनुसार आणि पसंतीनुसार कोणते माध्यम वापरायचे ते आपण ठरवावे.

आता हे बूटेबल पेनड्राईव्ह कसे तयार करायचे ते पाहू. यासाठी सर्वप्रथम ZOTAC WinUSB Maker या नावाचा बूटेबल मिडीया मेकर प्रोग्रॅम डाऊनलोड करुन घ्या. 


http://nathtel.blogspot.com/


युएसबी पोर्टमध्ये युएसबी पेनड्राईव्ह बसवा. तत्पूर्वी हा पेनड्राईव्ह रिकामा असल्याची खात्री करा. कोणत्याही महत्वाच्या फाईल्स त्यात ठेवू नका. कारण या प्रक्रिये दरम्यान पेनड्राईव्ह फॉरमॅट केला जातो. 

ZOTAC WinUSB Maker प्रोग्रॅम उघडा. खालील प्रतिमेत दाखविल्याप्रमाणे त्यामध्ये विंडोज एक्सप्लोररमध्ये दिसणारा युएसबी पेनड्राईव्हचा आयकॉन ड्रॅग अँड ड्रॉप करा. 


http://nathtel.blogspot.com/


त्यानंतर विंडोज 10 च्या ISO फाईलचा आयकॉन ड्रॅग अँड ड्रॉप करा. आणि मेक युसबी बुटेबल बटनावर क्लिक करा. 

http://nathtel.blogspot.com/


पेनड्राईव्हमधील फाईल्स फॉरमॅट करण्याची विचारणा केली जाईल त्याला होकार द्या. 

http://nathtel.blogspot.com/


त्यानंतर बूटेबल मिडीया निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु होईल, आणि ती पूर्ण होताच सक्सेसचा संदेश प्रदर्शित होईल. 

http://nathtel.blogspot.com/


याप्रकारे आपला विंडोज 10 च्या ISO फाईलवरुन बूटेबल पेनड्राईव्ह तयार झाला आहे.


विंडोज 10 थेट डाऊनलोड कसे करावे

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10


मायक्रोसॉफ्टने 29 जुलै 2015 रोजी सादर केलेली विंडोज 10 ही आधुनिक संगणक प्रणाली वापरुन पहाण्याची उत्सुकता सर्वच संगणक वापरकर्त्यांना नक्कीच लागलेली असेल. ही नव्याने सादर केलेली विंडोज 10 प्रणाली आपल्या संगणकावर स्थापित करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

पहिला पर्याय म्हणजे आपल्या संगणकावर पूर्वीच स्थापित असलेली विंडोज 7, विंडोज 8.1 प्रणालीसाठी नविन विंडोज 10 आरक्षित करुन अपग्रेड करणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळांवरुन विंडोज 10 डाऊनलोड करुन घेणे. यापैकी ज्यांनी पहिल्या पर्यायाचा अवलंब केलेला आहे, त्यांना अपग्रेडेशन काही काळ प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

आणि ज्यांना प्रतिक्षा करण्याची इच्छा नाही, त्यांच्यासाठी विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्याचा पर्याय उपयुक्त ठरेल. मात्र विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्यासाठी आधी मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर त्या टूलवर असलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडल्यानंतरच विंडोज 10 डाऊनलोड करुन घेण्याची प्रक्रिया सुरू होते. 

पण हे मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन न घेता ही विंडोज 10 ची ISO फाईल थेट कशी डाऊनलोड करुन घेता येईल, हे आपण आज येथे पहाणार आहोत.

मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळाला आपण भेट देतो तेव्हा तेथे सर्वप्रथम आपल्या संगणकावर कोणती प्रणाली स्थापित आहे, हे आपल्या नकळत तपासले जाते. आणि जर आपल्या संगणकावर विंडोजची प्रणाली स्थापित आहे हे त्या वेबसाईटला निष्पन्न झाले तर मिडीया क्रिएशन टूल डाऊनलोड करुन घेण्याचा पर्याय पुढे येतो.

आणि याच टप्प्यावर आपण एक छोटीशी युक्ती वापरुन, म्हणजे आपल्या संगणकावर विंडोज ऐवजी दुसरीच प्रणाली (उदा. मॅक, ऊबंटु, अँड्राईड इत्यादी) स्थापित आहे असे भासवून, आपण मिडीया टूल डाऊनलोड न करता ही विंडोज 10 ची ISO फाईल थेटपणे डाऊनलोड करण्याची लिंक प्राप्त करु शकतो. आणि त्यासाठी फार वेगळं असं काही करण्याचीही गरज पडत नाही. ही युक्ती काय आहे ते आता आपण पाहू.

गुगल क्रोम हा एक लोकप्रिय आणि बहुतांश संगणकांवर वापरला जाणारा वेब ब्राऊजर आहे. त्यामुळे आपणही आपल्या संगणकावर गुगल क्रोम हा वेब ब्राउजर वापरत आहात हे येथे गृहित धरु. तर आता या वेब ब्राऊजरमध्ये आपणाला फक्त एक छोटेसे एक्सटेन्शन अॅड करायचे आहे. युजर एजंट स्विचर या नावांचे हे एक्सटेन्शन गुगलच्या वेब स्टोअरमध्ये सर्च करुन अॅड करता येईल किंवा येथे क्लिक करुनही अॅ़ड करुन घेता येईल. 

हे एक्सटेन्शन आपण आपल्या गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये अॅड केल्यानंतर त्याचा आयकॉन ब्राऊजरच्या टूलबारवर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युजर एजंट याखाली ड्रॉपडाऊन मेनूमध्ये डिफॉल्ट सिलेक्ट असलेले आपणांस दिसेल. आता त्यावर क्लिक केल्यावर खाली दिसणाऱ्या यादीतील नावांमधून विंडोज ऐवजी दुसरी एखादी संगणक प्रणाली निवडा उदा. क्रोम ऑन मॅक. त्याचबरोबर ही निवड केल्यामुळे टूलबारवरील आयकॉनवर ऑन चे चिन्ह दिसेल. याचा अर्थ आता आपण युजर एजंट चेंज केला आहे. त्यामुळे आता आपल्या संगणकावरील स्थापित प्रणाली मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटला विंडोज ऐवजी मॅक आहे असे दिसेल.

http://nathtel.blogspot.com/
युजर एजंट स्विचर


हा टप्पा व्यवस्थितपणे पार पाडला आहे याची खात्री झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावरुन विंडोज 10 ची ISO फाईल थेट डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा. मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटला भेट देताच आता त्यांच्या तपासणीत आपल्या संगणकावर विंडोज ऐवजी दुसरीच प्रणाली स्थापित आहे असे दिसेल. त्यामुळे मग या वेबपेजवर विॆडोज 10 ची कोणती आवृत्ती आपणांस डाऊनलोड करुन घ्यायची आहे त्यासाठीचे पर्याय सर्वप्रथम आपणांसमोर येतील. त्यापैकी विॆडोज 10 हा पर्याय निवडा. किंवा आपल्या गरजेनुसार इतर दुसरा पर्यायसुध्दा निवडता येईल.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 आवृत्ती निवडीचे पर्याय


त्यानंतर भाषा निवडीचा आणखीन एक पर्याय आपणांपुढे येईल. त्यापैकी इंग्लिश हा पर्याय निवडा. त्यानंतर लगेचच आपणांसाठी विंडोज 10 ची ISO फाईल डाऊनलोड करुन घेण्यासाठी लिंक निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु झालेली दिसेल. ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या वेबपेजवर बॅकस्पेस किंवा पेज रिफ्रेश यासारखी कोणतीही कृती करु नका.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 भाषा निवडीचे पर्याय


त्यानंतर काही क्षणांतच विंडोज 10 ची ISO फाईल थेट डाऊनलोड करुन घेण्यासाठी, 32 बिट व 64 बिट अशा दोन पर्यायाद्वारे ती लिंक आपणांसमोर येईल. या दोन्ही पर्यायापैकी आपल्या गरजेनुसार आवश्यक त्या पर्यायाच्या बटनावर क्लिक करुन विंडोज 10 ची ISO फाईल आपणांस थेट डाऊनलोड करुन घेता येईल.

http://nathtel.blogspot.com/
विंडोज 10 डाऊनलोड लिंकचे पर्याय


महत्वाची सूचना : या डाऊनलोड लिंकची वैधता केवळ चोवीस तासच असते. त्यामुळे चोवीस तासांच्या आतच हे डाऊनलोडींग पूर्ण करुन घ्यावे लागते, हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही फाईल जलद गतीने डाऊनलोड करण्यासाठी एका फाईलचे सुमारे आठ भागात विभाजन करुन आठपट शीघ्र गतीने डाऊनलोडींग करण्यासाठी प्रसिध्द असलेला इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर सारखा एखादा प्रोग्रॅम यासाठी उपयुक्त ठरु शकेल.

एक SMS करेल तुमचे ईमेल अकाउंट हॅक




अनेक वेबसाईटस्, ईमेल अकाऊंटस्, विविध सोशल साईटस् वरील अकाऊंटस् हॅक केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. यातच आता तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करुन तुमचे ईमेल अकाऊंट हॅक करण्याच्या एका नव्या पध्दतीची भर पडली आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म Symantec ने पासवर्ड रिकव्हरी स्कॅम या नव्या पध्दतीबाबतची माहिती त्यांच्या ब्लॉगवर दिली आहे. या नव्या पध्दतीने ईमेल अकाऊंट हॅक करणाऱ्यासाठी किचकट कोडींग अथवा विशेष तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही. एखाद्याचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर माहित असणारा कुणीही हे करु शकतो.

साधारणपणे ईमेल अकाऊंटचे पासवर्ड रिसेट करण्याची पध्दती सर्व ईमेल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यामध्ये एकसारखीच असते. त्यामुळे या पध्दतीचा आधार घेत केलेल्या पासवर्ड रिकव्हरी स्कॅमच्या हल्ल्याचा परिणाम गुगल, याहू यासारख्या लोकप्रिय सेवांवर होऊ शकतो.

तसे बघायला गेले तर हॅकींगची ही नविन पासवर्ड रिकव्हरी पध्दती अतिशय सोपी आहे. त्यासाठी ज्यांच्या अकाऊंटचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर माहित असला की काम झालेच समजायचे. हे हॅकर्स पासवर्ड रिसेट कशा पध्दतीने करतात याची माहिती देणारा एक व्हिडीओ Symantec ने प्रसिध्द केला आहे.





हे कसे घडते?


कदाचित तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तर, व्हेरिफिकेशन कोड मिळावा यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जीमेल वर रजिस्टर केलेला आहे.




आता एखाद्या हॅकरला तुमच्या ईमेल अकाऊंटमध्ये घुसखोरी करायची आहे, पण त्याला तुमचा पासवर्ड माहित नाही. परंतु त्याला तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर माहिती आहे.




आता तो हॅकर जीमेल लॉगीन पेजवर जाईल आणि तुमचा ईमेल आयडी टाईप करेल. त्यानंतर तो Need help? या लिंकवर क्लिक करेल.



मग पासवर्ड रिकव्हरीच्या पध्दतीनुसार त्याच्यापुढे “Enter the last password you remember”, “Confirm password reset on my phone,” असे काही पर्याय येतील. पण ते टाळून तो “Get a verification code on my phone" हा पर्याय निवडेल. त्यातील a text message (SMS) हा पर्याय तो निवडेल.




त्याबरोबर जीमेलकडून सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तुमच्या मोबाईलवर “Your Google Verification code is [SIX-DIGIT CODE].” असा संदेश प्राप्त होईल.



    हॅकरला Google just sent a verification code असा संदेश दिसताच, तो तुमच्या मोबाईलवर “Google has detected unusual activity on your account. Please respond with the code sent to your mobile device to stop unauthorized activity." अश्या स्वरुपाच्या मजकूराचा SMS तुमच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरुन पाठवेल.


    सकृतदर्शनी खऱ्या वाटणाऱ्या या संदेशावर विश्वास ठेवून, तुम्ही ताबडतोब या संदेशाला प्रतिउत्तर म्हणून तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड पाठवता.



    तुम्ही तुमचा व्हेरिफिकेशन कोड त्याच्या हाती देता आणि हॅकरचे काम फत्ते होते. तो हा व्हेरिफिकेशन कोड वापरुन पासवर्ड रिसेट करतो, आणि तुमच्या ईमेल अकाऊंटमध्ये प्रवेश करतो. या पध्दतीने तुमचे ईमेल अकाऊंट मोबाईल नंबर आणि SMS च्या सहाय्याने हॅक केले जाते.



    हे होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?


    आवश्यकते शिवाय तुमचा मोबाईल नंबर कोणासही देऊ नका, अनोळखी व्यक्तीना मोबाईल नंबर देणे टाळा.


    ईमेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून व्हेरिफिकेशन कोड फक्त पाठविला जातो, तो पुन्हा परत मागितला जात नाही हे पक्के लक्षात ठेवा.


    व्हेरिफिकेशन कोड पाठवा असे सांगणाऱ्या संशयास्पद संदेशापासून सावध रहा.


    विशेषतः तुम्ही स्वतः जर अश्या प्रकारची विनंती तुमच्या ईमेल अकाऊंटसाठी केलेली नसेल तर आपले ईमेल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगा.


    तुमच्या नावाची रिंगटोन डाऊनलोड करा



    तोच तो पणाचा कंटाळा येत असलेल्या व्यक्तींना नेहमीच बदल हवा असतो, असाच काहीतरी बदल म्हणून आपल्या नावाची रिंगटोन मोबाईलमध्ये वापरण्याकडे सध्या मोबाईलधारकांचा कल दिसून येत आहे. स्वतःच्या नावाची रिंगटोन विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरुन व थोडीशी मेहनत घेऊन बनविता येणे शक्य आहे. पण सध्याच्या धावपळीच्या युगात सगळ्याच गोष्टी झटपट आणि तयार कशा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष असते.

    त्यामुळे तुम्हालाही तुमच्या नावाची आयतीच तयार असलेली रिंगटोन डाऊनलोड करुन घ्यायची असेल तर, मी तुम्हाला एक वेबसाईट सुचवितो. या वेबसाईटला भेट द्या. तेथील सर्च रिंगटोन्स या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या नावाची रिंगटोन उपलब्ध आहे का ते शोधू शकता. जर तेथे तुम्हाला हव्या असलेल्या नावांची रिंगटोन तयार मिळाली तर ती तुम्ही लगेचच डाऊनलोड करुन घेऊ शकता.

    त्याशिवाय तुमच्या नावांची रिंगटोन तेथे तयार नसेल, किंवा तयार आहे पण त्यामध्ये तुम्हाला काही बदल हवा असेल, तर तुम्ही रिक्वेस्ट रिंगटोन या पर्यायावर क्लिक करुन तुमच्या नावाची तुम्हाला पाहिजे त्या शब्दरचनेची रिंगटोन तयार करुन घेण्यासाठी, दिलेल्या सूचनेनुसार तेथे दिलेला फॉर्म भरुन पाठवावा लागेल. 

    याचसोबत या वेबसाईटवर लेटेस्ट, डेव्होशनल, फनी, मराठी, हिंदी, इन्स्ट्रूमेंटल इत्यादी इत्यादी अशा विविध प्रकारात उपलब्ध असलेल्या रिंगटोन्स सुध्दा पहावयास मिळतील.  

    अँड्रॉईड फोनवर हिंदी टाईप करा बोलून

    सध्याच्या स्थितीत स्मार्टफोन हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर चालूच असल्याचे दृश्य सगळीकडेच पहायला मिळते. या वापरापैकी बहुतेक जणांचा वेळ सोशल नेटवर्कींग साईटस् वर चॅटींग, व्हॉटसअॅप मेसेजेस, एसएमएस टाईपिंग करण्यात जातो.

    हेच सातत्याने करावे लागणारे टाईपींग हातांची बोटे न दुखविता स्मार्टफोन समोर बोलून टाईप कसे करता येईल, ते आपण या लेखात पाहणार आहोत. Voice to Text या पध्दतीने आपणाला इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलून टाईप करता येणे शक्य आहे.

    यासाठी आपणांस खालील पायऱ्यांचे अनुकरण करावे लागेल.

    1. सर्वप्रथम Settings मध्ये जाऊन Personal मेनू मधील 'Language & Inputs' या पर्यायावर टॅप करा.




    2. येथे Keyboard & Input methods मेनूखाली Google Voice Typing हा पर्याय चेक केलेला दिसेल. त्याच्या समोर दिसणाऱ्या सेटींग चिन्हावर टॅप करा.




    3. येथे Languages पर्यायाखाली Default Language primary English (India) अशी भाषा आधीच निवडलेली दिसेल. त्यावर टॅप करा. 




    4. त्यानंतर उपलब्ध भाषांची सूची समोर येईल. त्यापैकी हिंदी (भारत) ही भाषा निवडण्यासाठी या भाषेसमोरील बॉक्स चेक करा आणि सेव्ह वर टॅप करा.




    5. याप्रमाणे Voice to Text साठी Default English भाषेसोबतच हिंदी भाषेचाही पर्याय आपण समाविष्ट केला आहे.



    6. टाईपींग करताना Google voice typing हा पर्याय निवडण्यासाठी नोटीफिकेशन बारमध्ये दिसणाऱ्या Choose Input Method वर टॅप करा आणि हा पर्याय निवडा.

    7. किंवा हा पर्याय आपणांस किबोर्डवर दिसण्यासाठी वरील पायरी क्र.1 व 2 चे अनुकरण करा. आता येथे Google Voice Typing च्या वर तुम्ही वापरत असलेल्या कीबोर्ड समोरील सेटींग्जच्या चिन्हावर टॅप करा. त्यापैकी Google voice typing key समोरील बॉक्स चेक करा.




    8. यानंतर जेव्हा आपण कीबोर्ड पहाल, तेव्हा त्यावरील EN/HI या भाषा निवडीच्या बटणावर माईकचे चिन्ह दिसत असल्याचे लक्षात येईल.

    9. आता बोलून टाईप करण्याची चाचणी घ्या. त्यासाठी नोटपॅड ओपन करा. किंवा तुम्हाला टाईप करण्यासाठी तुमच्या आवडीचे हवे ते अॅप्लीकेशन जसे की, व्हॉटसअॅप, एसएमएस, फेसबुक इत्यादी ओपन करा. कीबोर्डवरील हिंदी भाषा निवडा. त्यानंतर बोलून टाईप करण्यासाठी हिंदी HI या भाषेची माईकचे चिन्ह असलेली कळ थोडीशी दाबून धरा. त्यानंतर तुमच्यासमोर माईकचे चिन्ह दिसू लागेल. तुम्ही हिंदी भाषेतून काही शब्द उच्चारा, त्याप्रमाणे ते टाईप झालेले तुम्हाला दिसतील. याचप्रकारे इंग्रजी भाषा निवडून इंग्रजी शब्दही टाईप करता येतील.


    सूचना: बोलून टाईप करण्यासाठी (Voice to Text) इंटरनेट कनेक्शन सुरू असणे आवश्यक आहे.

    विविध क्लाऊड स्टोअरेज अकाऊंटस् एकत्रित वापरा



    तुमचे गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, वनड्राईव्ह यासारख्या एकापेक्षा अनेक क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिसेसमध्ये अकाउंटस्  आहेत. आणि ही सगळी अकाऊंटस् स्वतंत्रपणे मॅनेज करताना तुम्हाला बरीच कसरत करावी लागते, त्यामुळे तुमची दमछाक होते. 

    कधी कधी तुम्हाला एका क्लाऊड स्टोअरेज मधून दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये काही फाईल ट्रान्स्फर करण्याची गरज भासते. तेव्हा तुम्हाला त्या त्या अकाऊंटमध्ये स्वतंत्रपणे लॉगीन व्हावे लागते आणि त्यानंतर त्या फाईल्स पीसीवर डाऊनलोड करुन पुन्हा दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये अपलोड कराव्या लागतात.

    या कटकटीमुळे तुम्ही वैतागला आहात. आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी एकदाच लॉगीन होऊन एकाच ठिकाणाहून करता आल्या असत्या तर बरे झाले असते, असा विचार तुमच्या मनात येत असणे साहजिकच आहे.




    तुमच्या कल्पनेमधला विचार आता प्रत्यक्षात आला आहे. वेगवेगळ्या क्लाऊड स्टोअरेजमधील फाईल्स आता एकाच ठिकाणाहून मॅनेज करणे शक्य झाले आहे. त्यासाठी मल्टक्लाऊड हा वेबबेस्ड फाईल मॅनेज सर्व्हिस चा पर्याय उपलब्ध झाला आहे. शिवाय तो सुरक्षित,विश्वसनीय व मोफत आहे असा दावा या सर्व्हिस प्रोव्हाडरकडून करण्यात आला आहे.

    • मल्टक्लाऊड काय आहे?

    मल्टक्लाऊड ही एक तुमचे विविध क्लाऊड स्टोअरेजवरील सर्व अकाऊंटस एकाच ठिकाणावरुन मॅनेज करणारी वेबबेस्ड सर्व्हिस आहे. सोप्या भाषेत ऑनलाईन क्लाऊड स्टोअरेज मॅनेजर आहे.

    • मल्टक्लाऊड सर्व्हिस सध्या खालील विविध क्लाऊड स्टोअरेजसाठी सपोर्ट करते

    Amazon S3, Google Drive, Box, Dropbox, SugarSync, OneDrive, Copy, BaiDu, FTP/SFTP, WebDav, Cubby, CloudMe, WEB.DE, MyDrive, Yandex, HiDrive, Bitcasa

    • विविध क्लाऊड स्टोअरेज मध्ये फाईल ट्रान्सफर

    एखादी फाईल पीसीवर डाऊनलोड करुन न घेता, सरळ एका क्लाऊड स्टोअरेजमधून दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये वळविणे किंवा स्थानांतरीत करणे शक्य झाले आहे. उदा. तुम्ही गुगल ड्राईव्हवरील एखादी फाईल कॉपी करुन सरळ वनड्राईव्ह वर पेस्ट करु शकता.

    • पॉवर ऑफ असतानाही फाईल ट्रान्सफर शक्य

    मल्टक्लाऊड background of transmission technology यासारखे टेक्नॉलॉजी वापरते, त्यामुळे पीसी चालू ठेवण्याची गरज नाही. ट्रान्सफर करण्याची फाईल तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करा, मल्टक्लाऊड सर्व्हर पुढील प्रक्रिया करेल तुमचा पीसी बंद असला तरी देखील.

    • शेड्युल ट्रान्सफर

    तुम्हाला काही फाईल्सचा बॅकअप वेळोवेळी आणि नियमीतपणे घेणयाची गरज पडत असेल, तर मल्टक्लाऊड मध्ये शेड्युल ट्रान्सफरचीही सोय आहे. त्यायोगे तुम्ही दैनिक, साप्ताहीक, मासिक किंवा तुमच्या गरजेनुसार हव्या त्या वेळेस आणि नियमीतपणे डाटा ट्रान्सफर करु शकता. आणि ती प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला ईमेलने सूचना दिली जाते.

    • क्लाऊड फाईल मॅनेजर

    विविध क्लाऊड ड्राईव्हवरील फाईल्स एकत्रितपणे मॅनेज करण्यासाठी क्लाऊड फाईल मॅनेजर उपयुक्त आहे. अपलोड, डाऊनलोड, कट, कॉपी, पेस्ट, मूव्ह, डिलीट, रिनेम, न्यू फोल्डर इत्यादी क्रिया विंडोज एक्सप्लोरर प्रमाणे या फाईल मॅनेजरच्या माध्यामतून पार पाडता येतात.

    • अधिक मोफत जागा 

    प्रत्येक क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस प्रत्येक अकाऊंटसाठी ठराविक प्रमाणात थोडीशीच मोफत जागा देते. मात्र त्या एकत्रितपणे वापरल्यास भरपूर मोठी जागा मोफत उपलब्ध होऊ शकते. उदा. तुमचे ड्रॉपबॉक्सवर पाच अकाऊंटस असतील तर प्रत्येकी दोन जीबी प्रमाणे दहा जीबी मोफत जागा वापरण्याचा लाभ मल्टक्लाऊडच्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल.

    तेव्हा या मोफत ऑनलाईन क्लाऊड स्टोअरेज मॅनेजर सेवेचा उपयोग करुन पहायला हरकत नाही. मल्टक्लाऊड वेबसाईटच्या होमपेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

    ऑनलाईन शॉपींग आणि साशंक ग्राहक (भाग दोन)


    भाग एकवरुन पुढे...

    यावरुन वस्तू, सेवा, दर्जा किंवा ऑनलाईन व्यवहारात झालेली फसवणूक याबाबतच्या तक्रारी म्हणजे खरेदी एका वेबस्टोअरवर, तक्रार दुसऱ्या फोरमवर, रिव्ह्यू तिसऱ्या संकेतस्थळांवर असा विस्कळीतपणा दिसून येतो. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण संबंधित वेबस्टोअर्सकडून होत नसल्याचे हे निदर्शक आहे.

    आणि अशा प्रकारे ऑनलाईन खरेदीच्या वाईट अनुभवात भरडून निघालेल्या ग्राहकांच्या तक्रारीचे पुढे काय होते, त्यापैकी किती तक्रारींची त्वरित दखल घेतली जाते व त्या ग्राहकांचे समाधान केले जाते. हे इतर खरेदीदारांच्या पुढे कधीच येत नाही. वस्तूंची अस्सलता, दर्जा, सेवा, फसवणूक याबाबत जर ग्राहकांचे समाधान त्या त्या वेबस्टोअर्सकडे वारंवार करुनही केले जात नसेल तर अश्या ग्राहकांना शेवटी ग्राहक मंचाचा आधार घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

    पण ग्राहक जर ग्रामीण भागातील अथवा तालुक्याच्या ठिकाणचा रहिवासी असेल तर, त्याला ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी, त्यानंतरच्या प्रत्येक तारखांना हजर रहाण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे घालणे, आपली बाजू स्वतः मांडता येत नसेल तर वकील नेमणे, याप्रकारे अर्थव्यय व कालापव्यय करणे कितपत परवडणारे व व्यवहार्य आहे हा सुध्दा एक प्रश्नच आहे.

    त्यातही छोट्याश्या रकमेच्या वस्तूबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे या भानगडीत न पडता, बरेच ग्राहक पैसे अक्कलखाती गेले अशी स्वतःची समजूत घालून गप्प बसणे पंसत करतात. तसे पाहता ऑनलाईन खरेदी व्यवहारासंदर्भातील तक्रारीसाठी ऑनलाईन तक्रारीची सोय व जलद गतीने ऑनलाईन निर्णय मिळण्याची सोय असणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने अश्या प्रकारची कुठलीच यंत्रणा आपल्या देशात सध्या अस्तित्वात नाही.

    ऑनलाईन शॉपींगमध्ये होत असलेल्या बहुतेक सर्व तक्रारी या वेबस्टोअर्सच्या उदासिनतेमुळे किंवा बेफिकीर वृत्तीमुळे निर्माण होतात असेच एकंदरीत दिसते. त्यांच्यावर नैतिकता सोडून कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. आणि नैतिकतेचे बंधन तरी किती वेबस्टोअर्स पाळतात ते तक्रारींच्या ओघावरुन दिसून येतेच. आज वेबस्टोअर सुरू करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कुणाच्याही मनात आले की तो ऑनलाईन व्यापारात उतरु शकतो. त्यासाठी कोणतीही बंधने किंवा नियम, विशेषतः ग्राहकहिताची जोपासना करण्यासंदर्भात नाहीत. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांच्या मनात असुरक्षिततेची भावना असणे साहजिकच आहे. ग्राहकांच्या मनातील ही भावना दूर होण्यासाठी, दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ट्रायसारख्या संस्थेप्रमाणे एक नियंत्रक संस्था ई-कॉमर्स क्षेत्रासाठी सुरू होण्याची आता खरी गरज आहे.

    ई-कॉमर्स क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या सर्व संस्थांना या नियंत्रक संस्थेकडे नोंदणी करणे सक्तीचे असेल. अनोंदीत संस्थांना व्यवहार करता येणार नाहीत. या नियंत्रक संस्थेकडून कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. ते त्यांना त्यांच्या वेबस्टोअरवर प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांवरही, त्याने केलेल्या प्रत्येक व्यवहाराबाबत वेबस्टोअरबद्दलचे मत मानांकन स्वरुपात या नियंत्रक संस्थेकडे नोंदवावे लागेल. तशी सोय त्या त्या वेबस्टोअरने ग्राहकांना त्यांच्या वेबस्टोअरवरच ग्राहकांना उपलब्ध करुन देणे बंधनकारक असेल. ग्राहकांनी दिलेल्या मानांकनाच्या आधारे व त्याचसोबत इतर ठरविलेल्या निकषांच्या आधारे ही नियंत्रक संस्था सर्व वेबस्टोअर्सना मानांकन प्रदान करेल. नोंदणी क्रमांकामुळे व मानांकनामुळे ग्राहकांना खरेदीपूर्वीच त्या वेबस्टोअरची विश्वासार्हता, गुणवत्ता कोणत्या श्रेणीची आहे याची कल्पना येईल. त्यामुळे कुठल्या वेबस्टोअरवर खरेदी करायची याचा निर्णय घेणे ग्राहकाला सोपे जाईल.

    त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान संबंधित वेबस्टोअरकडून झाले नाही तर, त्या ग्राहकाला या नियंत्रक संस्थेकडे ऑनलाईन तक्रार करुन त्वरित न्याय मिळविण्याचा अधिकार असेल. आणि जर या नियंत्रक संस्थेमार्फत ग्राहकांना न्याय मिळविण्याची वेळ आली, तर त्या वेबस्टोअरचे मानांकनही घटविले जाऊ शकेल. तसेच एखाद्या वेबस्टोअरबद्दल वारंवार तक्रारी येत असतील तर नियंत्रक संस्थेच्या तरतुदीनुसार त्या वेबस्टोअरला दंड भरण्याच्या, तसेच प्रसंगानुसार परवाना निलंबीत किंवा रद्द केला जाण्याच्या कारवाईलासुध्दा सामोरे जावे लागेल.

    अशी यंत्रणा निर्माण झाल्यास अस्सल वस्तू, उत्कृष्ट दर्जा, किफायतशीर दर, जलद व विनयशील सेवा ग्राहकांना पुरविण्याची जबाबदारी आपणावर आहे याची खरी जाणीव वेबस्टोअर्सना होईल. तसेच त्यांना मिळणारे मानांकनही यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांना आपले मानांकन टिकविणे व वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करणे भाग पडेल.

    या नियंत्रक संस्थेमुळे ग्राहकांनाही एक प्रकारचे सुरक्षा कवच प्राप्त होईल. ऑनलाईन खरेदीत आता आपली फसवणूक होणार नाही याची त्यांना खात्री पटेल. आणि त्यामुळे त्यांना निर्भयपणे मुक्तपणे ऑनलाईन खरेदीचा आनंद घेता येईल. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्र अश्या नियंत्रक संस्थेच्या नियंत्रणाखाली आणले जावे यासाठी, ग्राहकांचे हित जोपासण्यसाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व संस्था, राजकारणी मंडळी आणि ग्राहक अश्या सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आणि त्याला प्रबळ इच्छाशक्तीची जोड असल्यास ते अशक्यही नाही.

    § § §