मराठी सचिनचे इंग्रजी आत्मकथन | आगळं! वेगळं !!!

मराठी सचिनचे इंग्रजी आत्मकथन



सचिनच्या प्लेईंग इट माय वे या आत्मकथनाच्या इंग्रजी पुस्तकाचे काही भारतीय भाषांसोबत मराठीतही भाषांतर प्रकाशित करण्याचा निर्णय प्रकाशकांनी घेतला आहे.

एका दृष्टीने मराठी भाषिकांवर हा एक प्रकारे उपकारच झाला म्हणायचा. मराठी मातीत जन्मलेल्या, माय मराठी भाषा बोलत मोठा झालेल्या सचिनला आपले आत्मकथन लिहायला इंग्रजीचा आधार घेण्याची गरज का पडावी? विचार, आचार, बोलणे मराठीत पण आत्मकथन इंग्रजीत! इंग्रजी भाषेविषयी केवढं प्रेम!

ज्या महाराष्ट्रात तो वाढला, ज्या महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आंदोलने होतात, दुकानाच्या पाट्या इंग्रजीत लिहल्या तर त्यावर दगडफेक होते, त्या महाराष्ट्रात रहाणाऱ्या सचिनला आत्मकथन लिहताना मराठी भाषेचा विसर पडावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

मराठी माणसांनी मोठे केलेला, मराठी क्रिकेटपटू म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेला तो सेलिब्रेटी. त्याच्या या मराठी भाषेच्या दुराव्याविषयी त्याच्याविरोधात कोण बोलणार? कोण आंदोलन करणार? आणि ते होणारही नाही, कारण आंदोलनात, निदर्शनात केवळ सर्वसामान्यांना टार्गेट केले जाते, सचिनसारख्या सेलिब्रेटींना नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मराठी माणसाला अभिमान वाटेल अश्या सचिनसारख्या सेलिब्रेटीकडून मराठी भाषेची केली गेलेली ही उपेक्षा, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना निश्चितच अपेक्षित नसणारी अशी आहे.

त्याचे आत्मकथन सर्वप्रथम मराठी भाषेत प्रसिध्द होऊन, नंतर त्याचे इतर भारतीय व परकीय भाषेत अनुवाद प्रसिध्द झाले असते तर मराठी माणसांना त्याचा अधिक अभिमान वाटला असता.

सचिनवर प्रेम करणारा क्रिकेटप्रेमी रसिक समाजाच्या विविध स्तरात आहे. सचिनच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक त्यांना असणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे सचिनने आत्मकथन लिहलयं म्हणल्यावर ते वाचण्याची इच्छा त्याच्या मराठी भाषिक चाहत्यांनाही झाली असणार, पण इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे त्यांचा हिरमोडही नक्कीच झाला असणार.

पण त्यांचा विचार सचिनने पुस्तक लिहताना केलेलाच नाही, चाहत्यांचाही नाही अन् मायमराठीचाही नाही. कोणता वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्याने पुस्तक लिहले हे त्यालाच ठाऊक. शेवटी प्रकाशकांनाच मराठी माणसांची दया आली असावी (त्यांचा धंदा होणार हा भाग वेगळा), आता त्यांनी ही अडचण दूर करण्याचे ठरविले आहे.

आणि त्यामुळेच आता मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या मराठी भाषिक सचिनने इंग्रजीतून लिहलेले आत्मकथन आता अनुवादित करुन पुन्हा मराठीत आणले जाणार आहेत. सचिनसारख्या मराठी माणसाने इंग्रजीतून हे पुस्तक लिहल्यामुळे करावा लागत असलेला हा महाद्रविडी प्राणायम! मराठी सेलिब्रेटींचे मराठी भाषेविषयीचे प्रेम किती हे यातून स्पष्ट व्हायला हरकत नाही.


0 Comments:

Post a Comment