निवडणूका म्हणजे ...
निवडणूका म्हणजे ...
पक्षात सन्मानाने वागविले
जात नसल्याचा अचानकपणे
साक्षात्कार होण्याचा,
निवडणूकांची संधी साधत
पक्षांतर करण्याचा काळ
विरोधकांनी दिशाभूल केली
हे पटवून देण्याचा प्रयत्न
करत विकासाच्या आठवणीने
गळे काढण्याचा काळ
एकाला हात, तर दुसऱ्याला
लाथ देत गरळ ओकण्याचा,
मुखवटे फाडण्याचा काळ
आपण कधी काळी केलेली
कोणतीतरी कामे आठवून
आठवून सांगण्याचा काळ
पूर्तता करण्याची बंधने
नसलेल्या आश्वासनांची खैरात
जाहिरनाम्यातून करण्याचा काळ
पदयात्रेतून उसने हसू चेहऱ्यावर आणत
नको तिथे पायी चालण्याचा,
ज्यांच्याकडे वाहनांच्या काचेतूनही
बघायला कधीच सवड नाही
अशांचे पाय धरण्याचा काळ
मतांसाठी अपमान गिळण्याचा,
स्वाभिमान गहाण टाकण्याचा,
लाचारी पत्करण्याचा काळ
शत्रूत्व, मित्रत्व आणि
आत्मसन्मानांच्या व्याख्या
बदलण्याचा काळ
कार्यकर्ते, मिडीया, ज्योतिषी,
सर्वेक्षण संस्थांच्या तेजीचा,
सट्टेबाजांच्या चिंतेचा, म्हणजेच
कुणाचा धंदा, तर कुणाचा
वांधा होण्याचा काळ
आणि फक्त मतदान केंद्रात
जाईपर्यंतच मतदार राजाचा
मान मिळण्याचा काळ
chan.
ReplyDelete