व्हॉटॅन आयड्या सर्जी!
स्थळ : बारमधला एक निवांत कोपरा
वेळ : निवडणूकीतल्या रात्रीची
चार-पाच विविध पक्षांचे कार्यकर्ते बारमध्ये एकाच टेबलवर बसून घोटासह चकण्याचा मजा घेत गप्पा मारण्यात मग्न.
पहिला : काय बी म्हना राव, पन ह्या येळला आपलं तर डोस्कचं चालना झालयं.
दुसरा : कशामुळं?
तिसरा : आरं कशामुळं म्हून काय इच्यारतोय, कोन्ता पुडारी कुटं हाय तेच कळना झालय.
चौथा : खराय, काल हिकडं, आज तिकडं, तुम्चा आम्च्याकडं आन आम्चा तुमच्याकडं आस्लचं चाललय.
पहिला : म्हागच्या ईलेक्षनला ज्याच्या इरुध्द परचार केला, आता त्याज्याच बाजून करायची पाळी आलीय
दुसरा : आन त्या पुडाऱ्यांन्ला बी गोंदळल्या सारकं व्हत आसल, म्हंजी उगं पळत्या लोकलचा डबा पकडून गर्दीत घुसल्यासारकं वाटत आसल. जितं गेलेत तितल्या कुनाचीबी वळक ना पाळक.
तिसरा : म्हंजी मान ना मान मै तेरा म्हेमान म्हना की.
चौथा : बरोबर बोल्लात राव, आस्लं इनकमिंग चाल्लयं की आपन येकाद्याला मोबाईलवर इच्यारतो का न्हाई तुमी कुटं हैत म्हनून , तसं आता या उड्या टाकू पुडाऱ्यांन्ला तुमी आत्ता कुटं हैत आसं इच्यारायची पाळी आलीय.
पहिला : ह्या पुडाऱ्यांचं कसबी चालतय, पन आप्ल्यासारक्या कार्यकर्त्यांचं काय
दुसरा : आपन हैतच सतरंज्या उचलायला
तिसरा : हं आत्ता लक्ष्यात आलं, तरीच मी ईच्यार करतं हुतो की, आमचं रौल जी न्हेमीच तरुनांनी राजकार्नात यावं म्हनून आवतनं देत कशापाई फिरत असत्याय.
चौथा : अरे बाबानो, ह्या पुडाऱ्यांचं पेट्यात आन खोक्यात येव्हार चाललेले आसत्यात, कुटबी उड्या टाकोस्तोर टिकीट हातात आन त्यांच्याच घरच्यान्ला पुडं च्यान्स. आपल्याला कोन ईच्यारतोय? आपुन हित दिवस आन रात्र रक्ताचं पानी करत घर्रदार सोडून ह्येंचा परचार करत फिरत बसतो.
पहिला : आपल्याला तर आजपरेन कवा कुटं च्यान्स मिळाला न्हाय आन आसचं फ्री इनकमींग चालू ऱ्हायलं तर पुडंबी कवा मिळनार न्हाय ह्याची ग्यारंटी वाटायला लागलीय.
दुसरा : पन ह्याज्यावर पक्ष्याला काय उपाय काडता येत न्हाई का?
तिसरा : येतोय की, पन इच्छ्या पायजे ना. पुडारीबी आन पक्ष्यबी मतलबी हैत. आप्ली आप्ली सोय बगत्यात सगळेच जन.
चौथा : म्या तर म्हंतो आता आपुनचं ह्याज्यावर उपाय काडायला पायजे
तिघेही एका दमात : त्यो कंचा?
चौथा : आपन समद्या पक्ष्यातल्या कार्यकर्त्यांनी मिळून येक संगटना काडायची, त्येला नाव द्यायचं निष्टावान श्रमिक कार्यकर्ते संगटना
तिघेही : काडली संगटना, पुडं?
चौथा : पैली मागनी करायची, कंच्या बी पुडाऱ्याला पक्ष प्रवेश दिल्यावर त्या पुडाऱ्यानी कमीत कमी पाच वर्स पक्ष्याचं काम करायचं आन मगचं त्याला टिकीट द्यायंच का न्हाई हे ठरवन्यात यील.
तिघेही : आँ! लै झ्यॅक आयड्या रावं! तुमी तर टोटल इन्कमिंग आन औटगोईंगच बंद करायचा उपाय काडलात की राव. व्हॉटॅन आयड्या सर्जी! उद्याच चॅनलवाल्यांन्ला बोलवून घिवू आन आप्ली संगटना सुरू करुन टाकू. चियर्स!