प्रस्थापित पोरखेळ | आगळं! वेगळं !!!

प्रस्थापित पोरखेळ



वृत्तपत्रे प्रबोधन करतात हे आम्ही ऐकून आणि वाचूनही होतो, पण त्याची प्रचिती आम्हाला कधी आली नव्हती किंवा आम्ही ती घेण्याच्या फंदात पडलो नव्हतो. पण तो योग आज आलाच. त्याला कारणही तसंच घडलं. शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही दै. लोकमत मधील प्रस्थापित पोरखेळ नामक अग्रलेखावर नजर टाकली, अन् तत्क्षणीच हा साक्षात्कार आम्हाला झाला. अर्थात आमच्या बालबुध्दीमुळे असा साक्षात्कार व्हायला आमच्या वयाची पन्नाशी उलटावी लागली हा भाग वेगळा, असो.

तर या अग्रलेखातून जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आमचा पक्का समज झाला आहे. त्या प्रबोधनातून आम्ही जो काही बोध घेतला आहे, तो आम्ही आपणांपुढे जसाच्या तसा सादर करीत आहोत.

अग्रलेखाचे शीर्षक - प्रस्थापित पोरखेळ

कायद्याच्या कच्याट्यात अडकलेल्या कोणत्याही इसमाने उठावे आणि थेट पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करावी हा आपल्या राजकारणातील आताचा प्रस्थापित पोरखेळ आहे.

प्रकाश जावडेकरांसारखी हलकीफुलकी आणि जनाधारहीन माणसे जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे म्हणताना दिसतात तेव्हा ती याच पोरखेळाचा पुरावा देत असतात...इत्यादी इत्यादी आणखी बोध घेण्यासारखे बरेच काही

आमच्या बालबुध्दीला झालेला बोध - 1) प्रकाश जावडेकरांसारख्या हलक्या फुलक्या माणसांनी आपली प्रकृती लक्षात घेता पोरखेळ खेळायला जड असे दगड पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर दगडफेक करण्यासाठी उचलू नयेत. दुसऱ्या भाषेत हलक्याफुलक्या जावडेकरांनी पचायला जड (काँग्रेसला) असं काही उच्चारु नये.

2) केवळ प्रकाश जावडेकरांनीच नव्हे तर काँग्रेसेतर सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग किंवा काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अशी दगडफेक करण्यापूर्वी आपली प्रकृती हलकीफुलकी आहे की जड, मजबूत, भक्कम आहे, तसेच आपल्याला जनाधार आहे, की फक्त पक्षाचा आधार आहे हे दगडफेक करण्याआधी तपासून घेणे यापुढे अतिशय आवश्यक झाले आहे. ( खरं तर हे अनिवार्य करावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण यातून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना सूट देण्यात यावी अशीही सूचना आहे.)

या अग्रलेखात आणखीही बोध घेण्याजोगं बरंच काही लिहीलं आहे. पण आमची बालबुध्दी आत्ता तरी यापेक्षा अधिक काही टंकायला नकार देत आहे. तेव्हा तूर्त एवढेच पुरे.

0 Comments:

Post a Comment