वारकरी लहान, नेते महान!
सध्या पंढरीच्या वारीचे रिपोर्टींग करण्याची विविध
वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. खरे तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने
पंढरीची पायी वारी वर्षानुवर्षे करणाऱ्या वारकऱ्यांना अगदी आत्ता काही वर्षात सुरू
झालेल्या या लाईव्ह रिपोर्टींगचे कौतुक असण्याचे काहीच कारण नाही. आपला टीआरपी
वाढविण्याकडे लक्ष देणाऱ्या वाहिन्यांना मात्र त्याची आवश्यकता वाटत आहे. पण
रिपोर्टींग करण्यासाठी वारीसोबत जाणाऱ्या या वाहिन्यांच्या वार्ताहरांनी काही
गोष्टींचे भान राखण्याची गरज आहे.
या दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्याऐवजी जे सेलिब्रेटी
काही मिनीटांसाठी वारीत सहभागी होतात, त्यांना फुकटचा भाव देण्यामुळे खऱ्याखुऱ्या
वारकऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे, असे वारीचे विशेष बातमीपत्र पहाणाऱ्या सर्वसामान्य
प्रेक्षकांची भावना झाल्यास नवल नाही. खऱ्या वारकऱ्यांना या असल्या प्रसिध्दीची
हौस नसते. ते तर टाळमृदंगाच्या नादब्रम्हात दंग होऊन भक्तीरसात चिंब होऊन, विठ्ठल नामाचा
गजर करत उन-पाऊस, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता अथकपणे मार्गक्रमण करत असतात.
अलीकडे वारीमध्ये काही मिनीटांसाठी सामील होण्याची सेलिब्रेटी,
नेतेमंडळीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पण काही मिनीटांसाठी वारीत सामील झाल्यामुळे आपल्या
सोबत आलेल्या लवाजम्यामुळे आणि सिक्युरिटीमुळे, पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे
वाहणाऱ्या या भक्तीरसाच्या प्रवाहाला अडथळा होतो आहे याचे भान त्यांना रहात नाही.
आणि अशातच हे वार्ताहर तुम्ही मला सांगा, तुम्हाला या वारीत सामील झाल्यामुळे कसं
वाटतयं? काय वाटतयं? यासारखे भंपक प्रश्न विचारत त्यांच्या
मागेपुढे फिरत असतात. आता यावर हे सेलिब्रेटी म्हणतील की आम्हाला काही प्रसिध्दीची
हौस नाही. तर मग हे वार्ताहर त्यांना उगीचच का भाव देत त्यांच्या मागेपुढे गोंडा
घोळत का फिरत रहातात हेच समजत नाही.
त्याऐवजी त्यांनी वारीच्या मार्गावर रस्ते आहेत की खड्डे, त्यात
पाणी साठलयं की चिखल झालाय, वाहनांच्या रहदारीमुळे काय त्रास होतोय, उन-पाऊस,
थंडी-वारा याचा वारकऱ्यांना काय त्रास होतोय, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाअभावी
काही गैरसोयी होतात का, वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा, रॉकेल, गॅस, पाणी, रस्ता
सुरक्षा यासारख्या सुविधा, पुरेश्या प्रमाणात, वेळेवर व व्यवस्थिपणे मिळत आहेत का,
याबाबतचे वार्तांकन केल्यास वारकरी त्यांना धन्यवाद तरी देतील.
सर्व समान आहेत हा लहान आणि तो मोठा असा भेदभाव वारकरी
सांप्रदाय करत नाही त्यामुळेच जयहरी माऊली म्हणत वयस्करांनीसुध्दा लहानांचे पाय
धरलेले दिसतात. वारीसोबत जाणाऱ्या वार्ताहरांनी वारकरी सांप्रदायाच्या या शिकवणीचा
जर काही बोध घेतला तर वारकरी लहान आणि नेते महान असा भेदभाव दिसणार नाही.
***
0 Comments:
Post a Comment