March 2013 | आगळं! वेगळं !!!

शिवीगाळ, मारहाण करण्याचा पोलीसांना परवाना?



एका पोलीस कर्मचाऱ्याला विधानभवनांत मारहाण झाली काय अन् या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्वच थरांतून आणि प्रसिध्दी माध्यमांतून चढाओढ सुरु झाली. यांत आपण मागे राहिलो तर, आपण या मारहाणीचे समर्थक आहोत असा संदेश जाईल अशी भितीच जणू काही सगळ्यांना वाटू लागली की काय अशी शंका यायला लागली.
पण सर्वसामान्य माणूस रोजच अशा प्रसंगातून जात असतो. त्याचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी ही धडपड होताना दिसत नाही. उँचे लोग उँची बाते दुसरं काय?
या प्रकरणांत एकूण त्या पोलीसाला अथवा त्याच्या सहकाऱ्याला शिवी दिली असे त्याचे म्हणणे असल्याचे दिसते. आणि त्याच गोष्टीचा राग येऊन पुढचे सगळे रामायण घडले असे एकंदरित प्रथमदर्शनी वाटते. यावरुन या ऐरणीवर मला सर्वसामान्य माणसाचा मुद्दा आणायचा आहे. यांत आमदारांचा मुद्दा नाही किंवा त्यांच्या कृतीचे समर्थन नाही.
पोलीसाला शिवी दिली किंवा त्याच्यावर हात उचलला तर तो फार मोठा गुन्हा, पण पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकाला शिवी दिली, मारहाण केली तर तो मात्र गुन्हा नाही हे कसे? ज्या मध्यमवर्गीय पापभिरु सर्वसामान्य माणसांना असा अनुभव आला असेल त्यांना विचारा, की त्यांच्या मनावर याचे काय परिणाम होतात. हे आठवून त्यांची रात्री झोप उडते. मनांवर सतत दडपण येते. मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होते.
हे पोलीस कसले? हे तर खाकी वर्दीतले संघटीत अधिकृत गुंडच. कधी कधी हे इतके पिसाळतात की, मारहाण करताना यांच्यतला राक्षस जागा होतो तेव्हा त्या मार खाणाऱ्या व्यक्तीचा प्रसंगी जीवही जातो. अशी कित्येक उदाहरणे कित्येक पोलीस स्टेशनमध्ये घडलेली आहेत. आणि पुन्हा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील लोकांवर दबाव आणून हे लोक सहिसलामत सुटतात हेही तितकेच भीषण सत्य आहे.
तेव्हा या गुंडांना सर्वसामान्य माणसांशी कसे वागायचे? अठरा वर्षाखालील मुलांशी कोणत्या पध्दतीने बोलायचे यांना कोण शिकवणार? कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पहा काय चित्र दिसते ते. सर्वसामान्य घाबरणाऱ्या व्यक्तिंना काही कारणास्तव चौकशीसाठी बोलावले असेल तर, कशा प्रकारे शिवीगाळ केली जाते, कसा हात उगारला जातो. यांचे तोंड उघडले तरी गटार वहात असल्याचा भास होतो. पण हप्ते देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांशी मात्र हसून इज्जत देऊन बोलतात.
कायद्याच्या गोष्टी काय करता? कायद्याने पोलीसांना लोकांना मारहाण करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा परवाना दिला आहे काय? तसे असेल तर मग न्यायसंस्थेची गरजच काय? हे स्पष्ट होण्याची गरज आहे, याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही. स्वतःला शिवी दिली तर मिरची लागते, मग सर्वसामान्य लोकांच्या आई-बहिण रस्त्यावर पडल्या आहेत काय? आणि शिवीगाळ केली मारहाण केली या कारणांवरुन पोलीसांवर जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर, राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी कामावर दिसतील आणि किती जेलमध्ये बसलेले दिसतील याची कल्पना करा.
सर्वसामान्य माणूस शिवीगाळ ऐकून किंवा गालावर मारलेली चापट खाऊन आतून संतापाने खदखदत असला तरी काय करेल बिचारा? तो तर त्या आमदारांप्रमाणे पोलीसांना मारत नाही. तक्रार करायची तर त्याच्याकडे हेलपाटे मारायला वेळ नाही, कोर्टकचेरी वकील फी यांसाठी तो पैसा खर्च करु शकत नाही. आणि यातून जरी त्याने असे करायचे ठरवले तरी तो शिवीगाळ झाली मारहाण झाली ही गोष्ट कोर्टात सिध्द करु शकेल असे वाटत नाही कारण पोलीस स्टेशनच्या आत घडलेल्या या घटनेला साक्षीदार कोण? तर हे पोलीसच, मग ते आपल्याच सहकाऱ्यांविरुध्द साक्ष देतील काय?
म्हणजे सर्वसामान्य नागरिक इथे रोजच पोलीसांच्या शिव्या खातो, मारहाण सहन करतो. पण याची चर्चा प्रसिध्दी माध्यमांना करावीशी वाटत नाही. सर्वसामान्य माणसांच्या मागे आर्थिक, राजकीय पाठबळ नसल्याने त्याला हा अन्याय वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. मोठ्य़ा पदांवर असणाऱ्यांची चर्चा मात्र स्पर्धा लागल्याप्रमाणे सुरु रहाते. हा विरोधाभास आहे.
अर्थातच प्रत्येक गोष्टींना दोन बाजू असतात, उडदामाजी काळेगोरे असतात. त्याप्रमाणे पोलीसातही काही अपवादात्मक चांगले लोक आहेत. त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. चर्चा होण्याची गरज आहे ती, मस्तवाल पोलीसांची मस्ती कशी उतरेल याची, आणि सर्वसामान्य माणसाला जर काही प्रसंगाने पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले तर त्याला दिलासा कसा मिळेल याची.

ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय



ब्लॉगचा बॅकअप : एक नविन पर्याय


ब्लॉगरमध्ये ब्लॉगचा बॅकअप घेण्यासाठी Settings > Other > Export Blog असा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. परंतु त्याद्वारे एकावेळेस केवळ एकच ब्लॉगचा बॅकअप आपण घेऊ शकतो. पण गुगलच्या फारश्या प्रसिध्द नसलेल्या Google Takeout या सुविधेद्वारे ब्लॉगचा बॅकअप घेण्याचा दुसरा एक पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

गुगलच्या विविध सेवांचा उपयोग सर्वजण करतात. गुगलने विशेष प्रसिध्दी न करता, त्यांच्या उपयोगकर्त्यांना खात्याचा बॅकअप घेण्यासाठी Google Takeout या नावाने एक नविन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

याद्वारे सुविघेद्वारे Google+1s, Blogger, Buzz, Contacts, Drive, Google+ Circles, Google+ Stream, Pages, Picasa Web Albums, Profile, Reader, You Tube इतक्या सेवांचा आपल्या निवडीनुसार डाटा डाऊनलोड करुन घेता येतो.


या सुविधेद्वारे एकापेक्षा अधिक ब्लॉग्जचा बॅकअप सुध्दा एकाच वेळेस घेता येण्याची सोय आहे. आणि तेही आकाराने लहान अशा Zip स्वरुपातील फाईलमध्ये.

Google Takeout चा उपयोग कसा करावा






त्यासाठी प्रथम आपण या लिंकवर क्लिक करा. त्या विंडोमधील Choose Services बटन क्लिक करा. नंतर समोर येणाऱ्या विंडोमध्ये विविध सेवांचे बटन्स दिसतील. त्यापैकी Blogger बटनावर क्लिक करा. नंतर एक बॉक्स समोर येईल, त्यामध्ये एकूण तुमच्या सर्व ब्लॉगच्या Estimated files Size दिसेल. तुम्हाला जर सर्वच ब्लॉग्लचा बॅकअप नको असेल तर, तेथेच दिसणाऱ्या Configure पर्यायावर क्लिक करा. तेथे Download a single blog पर्याय निवडून तुम्हाला पाहिजे तो ब्लॉग निवडा. त्यानंतर खाली दिसत असलेल्या Create Archive वर क्लिक करा. आणि डाऊनलोडसाठी तयार असलेली फाईल डाऊनलोड करुन घ्या. Zip स्वरुपात प्राप्त झालेल्या फोल्डरमध्ये Atom स्वरुपातील फाईल असेल.

याप्रकारे ब्लॉगचा डाटा तुमच्याजवळ सुरक्षित राहील, व प्रसंगानुसार या डाटामधून तुमच्या ब्लॉगमधील लेख Settings > Other > Import Blog पर्यायाने पुन्हा परत मिळविता येतील.

वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत


वास्तूशास्त्राचे पुस्तक डाऊनलोड करा मोफत


वास्तूशास्त्राविषयीचे आकर्षण कुणाला नसते? तर सर्वांनाच असते. आणि त्याविषयी जमेल तशी आणि शक्य असेल तशी माहिती मिळविण्याकडे आणि वाचण्याकडे सर्वांचाच कल असतो. पण हीच भरपूर माहिती एखाद्या पुस्तकरुपाने आपल्या हाती पडल्यास आणि त्यातूनही ई-बुकच्या स्वरुपात चक्क मोफत मिळाल्यास दुधात साखरच म्हणावी लागेल.

तर आज आपण एका अशाच संकेतस्थळाबाबत माहिती घेणार आहोत. या संकेतस्थळांवर आपणांस वास्तूशास्त्राविषयीची माहिती मोफत मिळेल. वास्तूशास्त्र तत्व, तसेच एका बाजूने, दोन्ही बाजूने व तीन्ही बाजूने रस्ता असलेल्या उदाहरणांची अशी तीन चार प्रकारची वास्तूशास्त्राबद्दलची भरपूर  आकृत्या समाविष्ट असलेली ई-पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच याच संकेतस्थळावर धार्मिक संगिताचा मोठा संग्रह ही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार आपण धार्मिक संगीतही येथून डाऊनलोड करुन घेऊ शकाल. या संकेतस्थळावर ही सुविधा इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.

या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.