"आगळं! वेगळं!!!"ची वर्षपूर्ती | आगळं! वेगळं !!!

"आगळं! वेगळं!!!"ची वर्षपूर्ती

आज माझ्या "आगळं! वेगळं!!!" या ब्लॉगला १ वर्ष पूर्ण झालं. बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ ऑगस्ट २०१० रोजी मी हा ब्लॉग सुरु केला. मी ज्यावेळी ब्लॉग सुरु केला त्यावेळी मी ही ब्लॉगबाबतच्या प्रत्येक बाबीविषयी नवखाच होतो. जिज्ञासेने प्रत्येक गोष्ट जाणून घेत प्रगती करत राहिलो. कोणतीही व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थीच असते, असे मी मानतो. अजूनही शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे, त्यामुळे अजूनही विद्यार्थी होऊन शिकतच राहायचे आहे.


"आगळं! वेगळं!!!"च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ऋणनिर्देश :

माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या, मी लिहलेल्या लेखांचे, टोलेबाजीचे (नाहीतरी दुसरं काही लिहिता येतचं नाही म्हणा!) वाचन करणाऱ्या वाचकांचा (वाचनीय नसलेलं काहीतरी वाचत रहायचं म्हणजे नॉट ए जोक!) मी आभारी आहे. माझ्या लेखनावर प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहित करणाऱ्या वाचकांचाही मी आभारी आहे. खरेतर त्यामुळे मला लेखनप्रेरणा मिळत राहिली. मला आलेल्या अडचणीच्यावेळी मला तांत्रिक व मौलिक सल्ला देणाऱ्या 'ब्लॉग गुरूंचा'ही मी आभारी आहे. माझ्या ब्लॉगचे नाव विश्वातील सर्व वाचकापर्यंत पोहोचवून, माझ्या ब्लॉगला वाचकवर्ग मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या सर्व संकेतस्थळांचा, माझ्या ब्लॉगची लिंक स्वतःच्या ब्लॉगवर जोडणाऱ्या ब्लॉगर्स बंधू आणि भगिनींचाही मी आभारी आहे. एकूणच माझ्या ब्लॉगच्या या एक वर्षाच्या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींचा मी ऋणी आहे. (एक वर्षभर ब्लॉग चालविल्याचा फायदा : त्यानिमित्ताने तरी 'ऋणनिर्देश'ची संधी मिळाली! त्यानिमित्त आजच 'फुकट' भाव खाऊन घेतो, नाहीतरी आम्हाला पुन्हा कोण विचारणार आहे म्हणा?)

जाता जाता :

सुरुवातीच्या काळात दररोज एक याप्रमाणे पोस्ट लिहीत होतो. पुढेपुढे हे प्रमाण कमी होत गेले. आता तर १५ ऑगस्ट रोजी शुभेच्छा देणारी पोस्ट लिह्ल्यानंतर सुमारे पंधरा दिवस होऊन गेले आहेत. पण एकही पोस्ट नाही. एक वर्षाच्या आतच ब्लॉग 'बंद' पडला की काय अशी शंकाही काही जणांना आली असेल. पण माझाही सध्या तरी नाईलाज आहे. माझा व्यापार सांभाळूनच मला हा छंद जोपासणे भाग आहे. दुकानात सध्या कामगारांची असलेली अडचण, आगामी दसरा-दिवाळी सणांनिमित्त खरेदीला जाण्याचे प्रसंग, ग्राहकांची वर्दळ इत्यादीमुळे मनात असूनही बऱ्याचदा ऑनलाईनसुद्धा रहाता येत नाही. तेव्हा पोस्ट लिहणे तर लांबच अशी अवस्था आहे. त्यामुळे दिवाळी झाल्याशिवाय लिहण्यात नियमितता येईल असे वाटत नाही. खरेतर माझ्या अडचणींचा पाढा आपणापुढे वाचणे चुकीचे आहे, तरीही आपणाशी संवाद साधल्याशिवाय माझ्या लेखनाच्या अनियमिततेचं कारण आपल्या लक्षात कसं येणार?

कळावे, "आगळं! वेगळं!!!"च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपणाशी साधलेला हा संवाद आता येथेच थांबवितो. लोभ आहेच तो आणखीनच वृद्धिंगत व्हावा ही अपेक्षा! धन्यवाद!

0 Comments:

Post a Comment