बॉम्बस्फोट आणि मुंबईकर
१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
बॉम्बस्फोटाने कुणाच्या पदरात काय पडले?
आता बॉम्बस्फोट तर झाला. यातून कुणाला काय मिळाले? डोकी भडकवलेल्या दहशतवाद्यांना आसुरी आनंद मिळाला. त्यांनी जल्लोष केल्यास आश्चर्य वाटू नये. या बॉम्बस्फोटात जिवानिशी मरणारे हकनाक मेले. अनेक जण जखमी झाले. जे मरण पावले त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय पोरके झाले. जखमींच्या आयुष्याची गती काही काळ ठप्प झाली. शरीरावरील जखमा भरून आल्या तरी, मनावरील जखमा कायम राहतील.
बॉम्बस्फोट आणि राजकारण
मरणारे मेले, जखमी होणारे झाले, पण राजकारण्यांना त्याचे काय सोयरसुतक? कोणत्याही घटनेचे भांडवल करून राजकीय लाभ आपल्या पदरात कसा पडेल, हीच संधी साधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. आणि सरकारच्या बाजूने काय घडणार हे मुंबईकरांना सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही.
ज्यांच्या कारकीर्दीत यापूर्वीही मुंबईत बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले झालेले आहेत असे 'अनुभवी' गृहमंत्री आर. आर. पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, चेहरा स्थिर ठेऊन आणि चेहऱ्यावरील रेघही न हलवता फक्त डोळ्यांच्या बाहुल्या इकडेतिकडे करत 'कुणाचीही गय केली जाणार नाही, अपराध्यांना कठोर शासन केले जाईल' असली नेहमीची 'छापील आणि गुळगुळीत' वाक्ये पत्रकारांच्या तोंडावर फेकणार.
पिकनिकला आल्याच्या थाटात 'वडिलधारी' दिल्लीश्वर मंडळी मुंबईत येणार, मागे हात बांधून घटनास्थळी लांबूनच भेट, रुग्णालयात जाऊन पुढे हात बांधूनच जखमींची 'विचारपूस' असली ठरलेली नाटकं पार पडल्यानंतर 'उच्चस्तरीय' बैठक आणि 'सूचना' यांचा शेवटचा अंक आणि दिल्लीला परतण्याआधी पत्रकार परिषद आणि घोषणांची बरसात. किती दिवस ही नाटके लोकांनी सहन करायची? यांच्या भेटीमुळे सुरक्षाव्यवस्थेचा केला जाणारा अतिरेक लोकांनी कुठवर चालवून घ्यायचा? यापूर्वी याच दिल्लीश्वरांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात घेतलेल्या बैठका आणि त्यावेळी केलेल्या सूचनांचे आत्तापर्यंत काय झाले? हा प्रश्न यांना विचारणार कोण?
मुंबईकर सोशिक आहे, सहनशील आहे, धाडसी आहे, कोणत्याही प्रसंगाला तो घाबरत नाही असे कौतुक करून किती दिवस ही राजकारणी मंडळी आपली जबाबदारी झटकणार? या राज्यात सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरणारे नेते सुरक्षित आणि सर्वसामान्य लोक असुरक्षित हे चित्र बदलणारच नाही असे दिसते. राज्यकर्त्यांच्या या दांभिकपणाविरुद्ध जनतेच्या मनात जो तीव्र असंतोष खदखदत आहे, त्याचा पुढेमागे कधीतरी स्फोट झाला तर त्याची त्याची तीव्रता किती दाहक असू शकते हे नेतेमंडळींना कळेल तेव्हा त्यांच्या पार्श्वभागाखालील सिहासनांच्या चिंधड्या उडालेल्या असतील.
यापूर्वी झालेले बॉम्बस्फोट आणि काल झालेल्या बॉम्बस्फोटाचा प्रसंग पहाता, फक्त एक मुंबईकरच दुसऱ्या मुंबईकरांच्या मदतीला कोणीही न बोलावता स्वतः होऊन धावत येतो हे सगळ्या जगाने पहिले आहे. त्यावेळी तो समोरच्या जखमीचा प्रांत, धर्म म्हणजे तो यूपीचा भैय्या की बिहारी, गुजराथी की राजस्थानी, हिंदू की मुस्लीम हे बघत नाही. त्याला तो समोरचा जखमी अवस्थेत तडफडणारा माणूस दिसत असतो. आणि त्याला कसेही करून त्वरित रुग्णालयात पोहोचविणे आणि त्याचा जीव वाचविणे इतकेच ध्येय त्याच्यासमोर असते.
त्यासाठी तो अॅम्ब्युलंसचीही वाट पहात नाही, टॅक्सी, टेम्पो, हातगाडी अश्या कोणत्याही साधनांचा वापर करून आपले कर्तव्य निरपेक्षपणे पार पाडत असतो. राजकारण्याप्रमाणे त्याला फोटो, टीव्हीवर बाईट्स असल्या प्रसिद्धीचीही हौस नसते. मुंबईकरात आजही माणुसकी जिवंत आहे, आणि त्याच्या संवेदना बोथट झालेल्या नाहीत हे तो अशा प्रसंगी दाखवून देतो.
अश्या सर्व मुंबईकरांना संपूर्ण देशवासियांचा सलाम! दांभिक राजकारणी यांच्यापासून काही धडा घेतील का?
0 Comments:
Post a Comment