बीएसएनएलची ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना | आगळं! वेगळं !!!

बीएसएनएलची ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना

बीएसएनएल ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना सादर करणार ही बातमी सकाळनेच सोमवार दि.४ जुलै रोजी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर प्रतिक्रियांचे वादळ उठले. ही बातमी ई-सकाळच्या http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm या लिंकवर वाचता येईल.


त्यावर मंगळवारच्या सकाळमध्येच 'आप ओबीसी हैं...' अश्या शीर्षकाचे टीकात्मक विशेष संपादकीय लिहण्यात आले आहे. तसेच आता द्या 'मूर्ख टू मूर्ख' फ्री... 'बीएसएनएल'च्या योजनेचा नेटिझन्सकडून 'ई-सकाळ'वर प्रतिक्रिया या शीर्ष आणि उपशीर्षकाखाली प्रतिक्रियांची संकलीत बातमी देण्यात आली आहे.

यातून सर्वांचा या योजनेवर टीका करण्याचाच सूर दिसतो. फक्त ओबीसींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, मग त्यांना मिळणार आणि आपल्याला नाही या मत्सराच्या भावनेने उठलेल्या पोटशूळातून या उपहासात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे दिसते.

ही योजना सुरु केल्यास बीएसएनएलच्या सध्याच्या सर्वसाधारण ग्राहकांचे काही नुकसान होणार आहे का? त्यांचे सध्याचे दर वाढवून, त्यांच्या खिशात हात घालून बीएसएनएल ओबीसींना सवलत देणार आहे का? या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केले गेले आहे. राहिला प्रश्न या योजनेमुळे होणाऱ्या बीएसएनएलच्या आर्थिक फायद्या-तोट्याचा, ती काळजी करायला बीएसएनएल समर्थ आहे, इतरांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही. 

तसे पहिले तर बीएसएनएलची ही बाजारपेठ काबीज करण्याच्या व्यवसायनीतीचा एक भाग आहे. आणि मोठे समाजघटक आपल्याकडे खेचण्यासाठी बीएसएनएलने प्रथमच अशी काही योजना सादर करण्याचा प्रयत्न केला आहे अशातलाही भाग नाही. तर बीएसएनएलने यापूर्वीही शेतकरी, सैन्यातील जवान, विद्यार्थी,शासकीय कर्मचारी यांच्यासाठी अनेक योजना सादर केलेल्या आहेत. त्यावेळी या योजनेवर टीका करणारे टीकाकार गप्प बसले, त्या योजनांवर कोणतीही टीका झाल्याचे ऐकीवात नाही. पण मुलांच्या नावे विद्यार्थी योजनेचा, सातबारा उतारे असलेले परिचित गाठून कृषी योजनेचा फायदा मात्र अनेकांनी उठविला आहे.

या योजनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. कुणाला बीएसएनएलची ही सामाजिक बांधिलकी वाटेल, कुणी ही व्यवसायनीती आहे असे मानेल, कुणाला यात राजकारण दिसेल. तरीही शेवटी असूयेपोटीच टीका करायची का? याचा विचार होणे गरजेचे आहे.

2 Comments:

  1. तुम्ही स्वत: ओबीसी आहात असे वाटते. जातीच्या आधाराव अशा सवलती टेलिकॉम सारख्या क्षेत्राद देणे देशासाठी हितकारक नाही. फुकटात मिळणा-या कॉलिंगच्या मोहापाई समाजात जातपात बोकाळायला मदत करु नका.

    ReplyDelete
  2. या योजनेचे स्वागत करणारे ओबीसी आणि विरोध करणारे सर्वसाधारण असा भेदभाव करणे सोडून द्या. केवळ यामुळेच जातपात बोकाळेल असे म्हणणे कितपत योग्य ठरेल? सवलती बद्दल म्हणाल तर सर्वच क्षेत्रातील सर्वांच्याच सवलती बंद करायला पाहिजेत. फक्त बीएसएनएलच्या योजनेविरुद्ध ओरड करून उपयोग नाही.

    ReplyDelete