राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे
अजित पवार यांनी कोणताही संदर्भ नसताना अचानकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली टीका, आणि राष्ट्रवादीने काहीही कारण नसताना केलेली दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी या दोन्ही गोष्टी साहजिक वाटत असल्या तरी या दोन्ही गोष्टी सहजपणे घडलेल्या नाहीत, तर त्या राष्ट्रवादीच्या कूटनीतीचा एक भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अचानक आणि अनपेक्षितपणे केलेली टीका आणि दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी करण्यात राष्ट्रवादीने काही गोष्टीवर निशाना साधल्याचे लक्षात येते. एक म्हणजे आठवले शिवसेनेसोबत गेले त्याचे शल्य राष्ट्रवादीला बोचत आहे, त्याहीपेक्षा दलित मतांचा गठ्ठा गेला त्याचे दुखः अधिक आहे. त्यामुळे त्या नैराश्यापोटी आणि महानगरपालिकेची निवडणूक डोळयासमोर ठेवून जाणीवपूर्वक आखलेली ही रणनीती आहे असे म्हणता येईल. दुसरे म्हणजे पवार कुटुंबियावर अनेक प्रकरणात होत असलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी अस्वस्थ आहे, त्यामुळे दुसरा एखादा मुद्दा फोकस झाल्यावर जनतेचे लक्ष आपोआपच तिकडे जाईल या हेतूनेही ही टीका आणि मागणी केली आहे असे म्हणायला जागा आहे.
टीका आणि मागणी हा सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारणाचा भाग असतो हे कुणीही मान्य करेल, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पवार कुटुंबियावर आणि त्यातही प्रत्यक्ष अजित पवार यांच्यावर कुठलीही टीका केलेली नसताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वय आणि जेष्ठता याचा अजिबात विचार न करता अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करून आपली मर्यादा सोडली आहे हे स्पष्ट होते. एकवेळ त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असती तरीही लोकांना त्याचे काही वाटले नसते, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करून संयम सुटल्याचे दाखवून दिले आहे. नारायण राणे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत अनेक वेळेस ठाकरी शैलीतून झोंबणारी टीका केली आहे, पण नारायण राणे यांनीसुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वय व जेष्ठता यांचा सन्मान राखून त्यांच्यावर कधीही टीका करून आपली मर्यादा ओलांडली नाही, आजही ते बाळासाहेबांचा आदर करतात, हा त्यांचा मोठेपणा येथे लक्षात घेण्यासारखा आहे.
राहिला दुसरा मुद्दा नामांतराचा. ही मागणी दलित समाजाने सुद्धा अलीकडच्या काळात केली असल्याचे आठवत नाही, त्यामुळे हे खाजवून अवदान आणण्याचे कारण काय? जे स्टेशन आजपर्यंत दादर आहे, उद्या कदाचित नामांतर झाले तर चैत्यभूमी होईल, त्यामुळे प्रवाश्यांना दादर स्टेशनवर पाय ठेवला काय किंवा चैत्यभूमी स्टेशनवर पाय ठेवला काय याने काहीही फरक पडणार नाही, पण नामांतराची मागणी करून राजकीय खेळी खेळणारांना मात्र निश्चीत फरक पडेल. पण वर्षानुवर्षे दादर या नावाशी असलेली नाळ तुटल्याचे दुखः मात्र मुंबईकरांना निश्चितच होईल. परंतु त्याचे सुखदुःख स्वार्थी राजकारण करणारांना नक्कीच नाही.
यानिमित्ताने राष्ट्रवादीला आणि सर्वच राजकीय पक्षांना कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की, कृपया अश्या प्रकारचे राजकारण करून समाजात जातीय तेढ निर्माण करु नका. सलोख्याने एकत्र नांदणाऱ्या लोकांची मने या मुद्यावरून एकमेकाविषयी कलुषित करु नका. निवडणूकीत मते मिळण्यासाठी समाजात फूट पडण्याचे घाणेरडे राजकारण कुणीही करु नका. अशी मागणी करण्याने भांडणे, मारामाऱ्या आणि प्रसंगी दंगलीही होऊ शकतात. सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान, वित्तहानी आणि प्रसंगी जीवित हानीही होऊ शकते, त्यांची जबाबदारी कोण घेणार? याचा विचार अशी मागणी करण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी दहावेळा करावा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण सध्या कोणत्या दिशेने चालले आहे याचा विचार लोकांनी करावा.
0 Comments:
Post a Comment