अजित पवार यांनी कोणताही संदर्भ नसताना अचानकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली टीका, आणि राष्ट्रवादीने काहीही कारण नसताना केलेली दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी या दोन्ही गोष्टी साहजिक वाटत असल्या तरी या दोन्ही गोष्टी सहजपणे घडलेल्या नाहीत, तर त्या राष्ट्रवादीच्या कूटनीतीचा एक भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अचानक आणि अनपेक्षितपणे केलेली टीका आणि दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी करण्यात राष्ट्रवादीने काही गोष्टीवर निशाना साधल्याचे लक्षात येते. एक म्हणजे आठवले शिवसेनेसोबत गेले त्याचे शल्य राष्ट्रवादीला बोचत आहे, त्याहीपेक्षा दलित मतांचा गठ्ठा गेला त्याचे दुखः अधिक आहे. त्यामुळे त्या नैराश्यापोटी आणि महानगरपालिकेची निवडणूक डोळयासमोर ठेवून जाणीवपूर्वक आखलेली ही रणनीती आहे असे म्हणता येईल. दुसरे म्हणजे पवार कुटुंबियावर अनेक प्रकरणात होत असलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी अस्वस्थ आहे, त्यामुळे दुसरा एखादा मुद्दा फोकस झाल्यावर जनतेचे लक्ष आपोआपच तिकडे जाईल या हेतूनेही ही टीका आणि मागणी केली आहे असे म्हणायला जागा आहे.