कौतुक मराठी ब्लॉग्जचे | आगळं! वेगळं !!!

कौतुक मराठी ब्लॉग्जचे

रविवार दि. २७ मार्च २०११ रोजी सकाळी सहजपणे टीव्ही लावला असता, स्टार माझा वाहिनीवर मराठी ब्लॉगर्सना स्टार माझातर्फे आयोजित केलेल्या पारितोषक व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पाहण्यात आला. ज्यांचे ब्लॉग आपण नेहमी पाहतो, वाचतो त्या ब्लॉग्जधारकांना प्रत्यक्षपणे टीव्हीवर पारितोषिके स्वीकारताना व आपले मनोगत व्यक्त करताना बघून
एक वेगळाच आनंद वाटला. त्याचसोबत त्यांच्या ब्लॉग्जची छोटीशी झलकही दाखविण्यात येत होती. हा कौतुक सोहळा खरोखरीच आनंददायक होता. यातील सर्व विजेत्यांचे मी जाहीरपणे अभिनंदन करतो.


मराठी ब्लॉग्जचे विश्व आता दिवसेंदिवस बहरत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक मराठी ब्लॉग लेखकांना आपल्या ब्लॉगचे वाचकाकडून कौतुक व्हावे, सहभागी झालेल्या स्पर्धेतील परीक्षकाकडून आपल्या ब्लॉगचे योग्य मूल्यमापन व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. आणि त्यादृष्टीने प्रत्येकांने अवश्य प्रयत्न करावेत असे माझे मत आहे. पण या प्रकारच्या स्पर्धांची माहिती सर्वच ब्लॉगर्स पर्यंत पोहोचणे तितकेच महत्वाचे आहे. कारण स्टार माझा तर्फे घेण्यात आलेली ही तिसरी स्पर्धा होती हे स्टार माझा-३ या नावावरून माझ्या लक्षात आले. ही स्पर्धा केव्हा घेतली जाते याची निदान मला तरी कल्पना नाही.

मराठी ब्लॉग्जना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार माझाप्रमाणे अन्य मराठी वाहिन्यांनीही आणि मराठीविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्ती, संस्थानीही अश्या प्रकारचे उपक्रम हाती घ्यावेत अशी अपेक्षा यानिमित्ताने मी व्यक्त करतो. अशी अपेक्षा व्यक्त करण्याचे कारण असे की, प्रत्येक ब्लॉग धारक आपापल्या परीने उत्तम लिहण्याचा आणि विविध प्रकारची चित्रे, फोटो, व्हिडिओज असे दर्जेदार साहित्य सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.

पण स्टार माझा ही एकटीच वाहिनी या प्रकारची स्पर्धा आयोजित करत आहे असे दिसते. त्यामुळे विजेत्यांची संख्या ठरविण्याबाबत मर्यादा येणे साहजिकच असणार. म्हणून या स्पर्धेत निवड झाली नाही याचा अर्थ इतर ब्लॉग्ज दर्जेदार नसतीलच असा नाही. त्यामुळे इतरही उत्कृष्ट ब्लॉग्जधारकांमध्ये आपल्यावर अन्याय झाला अशी भावना निर्माण होऊ नये, यासाठी स्टार माझा व्यतिरिक्त इतरांनीही स्पर्धांचे आयोजन करावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली आहे. म्हणजे सर्वच चांगल्या ब्लॉग्जचे कौतुक होत राहील, मूल्यमापन होत राहील आणि यामुळे अशा ब्लॉग्जधारकामध्ये आपल्यावर अन्याय झाला किंवा होतो आहे ही भावना दूर होण्यास मदत होईल असे मला वाटते.

0 Comments:

Post a Comment