कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र
हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.
कुठलाही वॉलपेपर डाउनलोड केलेला नसताना किंवा कोणत्याही प्रमोशनल कॉलच्या अमिषाला बळी न पडता कॉलर ट्यून लावलेली नसताना किंवा कोणताही पॅक अॅक्टीव्हेट केलेला नसतानाही या मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या बॅलन्सवर डल्ला मारत आहेत. याविरुद्ध तक्रार न करता गप्प बसणारांचे बॅलन्स म्हणजे या कंपन्यांना चरायला मोकळे सोडलेले कुरणच असे म्हणायला हरकत नाही.
दोन-तीन, पाच-दहा रुपयासाठी कुठे तक्रार करत बसायची? अशी अनेकांची मानसिकता असते. आणि तसे पहायला गेले तर त्यात काही गैरही नाही. पण "म्हातारी मेल्याचे दुखः नाही, पण काळ सोकावता काम नये" ही म्हण येथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ग्राहक तक्रार करत नाही हे पाहून त्यांचे साहस अधिकच वाढते.
मग तक्रार करायची ठरवली तर, कस्टमर केअरची (कस्टमरचा केर क(च)रा) उर्फ 'ग्राहक छळवाद केंद्राची 'आठवण येताच नको ती तक्रार अशी पुन्हा एकदा मनाची तयारी होते. त्याला कारणेही तशीच आहेत. कारण या छळवादाचा अनुभव आपणापैकी प्रत्येकाने घेतलेला आहे.
एक तर येथे कॉल लागणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखे आहे. छळवाद नं. एक : म्हणजे भरपूर वेळ ग्राहकांना तिष्ठत ठेवून त्याला कॉलच्या आधीच कटवायचा प्रयत्न करणे. छळवाद नं. दोन : म्हणजे कॉल अटेंड करणारा प्रतिनिधी स्वतःचे नाव (भरभर आणि न ऐकू येईल असे) सांगून पुढे 'गूढ आणि अगम्य भाषेत' जी काही अस्पष्ट पुटपुट करतो, त्याचा अर्थ भल्याभल्यांनाही समजणे कठीण.
छळवाद नं. तीन : हे झाले की, मग सुरु होते आपल्या नावाची आणि मोबाईल नंबरची चौकशी. आता आपला हा मोबाईल नंबर त्याला समोरच्या स्क्रीनवर दिसत असतो बरं का, पण हा आपल्याला "तुमचे नाव मला कळू शकेल का? तुमचा नंबर मला कळू शकेल का? हा नंबर कुणाच्या नावावर आहे हे मला कळू शकेल का?" अशा 'वरून नम्र' वाटणाऱ्या पण 'आतून खवचट' असणाऱ्या भाषेत पिडल्याशिवाय सोडेल तर शप्पथ.
छळवाद नं. चार : मग हे सगळे सोपस्कार उरकले की, तो म्हणतो बोला मि. अमुकतमुक मी आपली काय सहायता करू शकतो? मग आपण आपली तक्रार त्याला सांगितल्यावर तो आपल्यावर पुन्हा प्रतिप्रश्नाचा मारा सुरु करतो आपला बॅलन्स किती आहे हे मला कळू शकेल काय? आपण शेवटचे रिचार्ज कधी केले होते मला कळू शकेल काय? वास्तविक पहाता ही सर्व माहिती तो समोरच्या स्क्रीनवर याची देही याची डोळा पहात असतो. पण ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करण्यापेक्षा ग्राहकाला जास्तीत जास्त अडचणीत आणणारे प्रश्न विचारून त्यांना छळण्यात त्याला अधिक आनंद मिळतो.
छळवाद नं. पाच : बऱ्याचवेळी तुम्ही एक माहिती विचारता तेव्हा तो दुसरीच माहिती तुम्हाला देतो. उदा. तुम्ही विचारता की, जीपीआरएस मध्ये एक नविन पॅक आला आहे, त्याबाबतचा एसएमएस मला आला आहे, त्याची माहिती पाहिजे. तर तो म्हणतो त्यासाठी तुम्हाला प्रथम जीपीआरएसचे सेटिंग तुमच्या मोबाईलवर कसे मिळवायचे याबाबत तुम्हाला माहिती हवी आहे बरोबर? तुम्ही मला 'सेटींगची माहिती नकोय' म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न करता. पण तो तुम्हाला सेटिंग मिळविण्यासाठी काय करायचे याची माहिती देऊन अज्ञान बालकाला प्रबोधन करावे त्या आविर्भावात छळतो. या प्रकारे तुम्ही 'सखाराम' म्हणता तेव्हा तो 'तुकाराम' म्हणतो आणि तुम्ही 'राधेश्याम' म्हणता तेव्हा तो 'सीताराम' म्हणतो. याप्रकारे हा पाठशिवणीचा छळवादाचा खेळ सुरु असतो.
छळवाद नं. सहा. : मग काही वेळा त्याच्याकडून ठासून रेटून उत्तर मिळते की, तुम्ही अमुकअमुक पॅक अॅक्टीव्हेट केला आहे, त्याचे पैसे तुमच्या बॅलन्समधून वजा झाले आहेत. मी असा कोणताही पॅक अॅक्टीव्हेट केला नाही हे तुम्ही त्याला कितीही परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात तरीही तो म्हणतो, माफ करा मी याबाबत काहीच करू शकत नाही. याव्यतिरिक्त आपणाला आणखी काही माहिती हवी आहे का? असे विचारून तो विषय तेथेच संपवून मोकळा होतो.
छळवाद नं. सात : काही वेळा तो म्हणतो कृपया आपण काही वेळ प्रतीक्षा करू शकाल का? मी चेक करून सांगतो. आपण हो म्हणल्यावर तो पठ्ठ्या तुम्हाला होल्डवर ठेऊन काय करत बसतो ते देव जाणे. या परिस्थितीत बऱ्याच वेळेस ग्राहक कंटाळून कॉल बंद करतात. (कटविण्याची आणखी ही एक आयडीया)
छळवाद नं. आठ : याउप्परही त्याला अडचणीत आणणारे प्रश्न जर ग्राहक विचारू लागले तर, आत्ता सिस्टीम स्लो आहे, सर्व्हर डाऊन आहे असला काहीतरी टेक्निकल प्रोब्लेम (नसलेला कारण
तुम्ही कुठे पाहायला येणार आहात?) ग्राहकाच्या तोंडावर फेकला जातो. आणि तुम्ही दोन तासानंतर कॉल करा असे सांगितले जाते. त्यामुळे त्याची होते सुटका आणि ग्राहकांच्या पदरी येते निराशा.
या प्रतिनिधींना ग्राहकांचा छळ कसा करावा याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते की काय? अशी शंका येते. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या आणि आणखीन याव्यतिरिक्त बऱ्याच प्रकारच्या छळवादाला कंटाळलेले ग्राहक कस्टमर केअरच्या उर्फ 'ग्राहक छळवाद केंद्राच्या' नादी लागायला तयारच नसतात.
या समस्येवर मात कशी करता येईल ते पुढील लेखात आपण पाहू.
खरे आहे तुमचे, आपण आधीच पैसा देऊन फ़ाटक्यात गेलेलो असतो "प्रीपेड " मधे, प्रीपेड मधे फ़क्त एयरटेल ची सेवा जरा स्टॅंडर्ड वाटली मला, आयडीया परवडत नाही विद्यार्थ्यांना अन बी.एस.एन.एल हात दाखवुन अवलक्षण आहे !!!!!
ReplyDeleteखरोखरच कधी-कधी मोबाइल कंपन्या जीव मेटाकुटीस आणतात हो!
ReplyDelete