लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे 'मराठीच्या पिंडावरील कावळे' हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का 'फुल्या-फुल्या' मारून वेळ मारून न्यावी? परवा एका वाचकाचा फोन आला होता, तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला. जे काही घडले ते जसेच्या तसे कळणे, हा वाचक या नात्याने आमचा हक्क आहे. इंग्रजी वृतपत्रे असभ्य ठरविलेल्या शब्दांचे रिपोर्टिंगही करतात. मराठीत ते का घडू नये, असे या वाचकाने ठणकावून सांगितले. याला निमित्त ठरले लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी. जनगणना कर्मचाऱ्यावर चिडलेल्या एका महिलेने या कर्मचाऱ्याला 'भाड्या' म्हनून शिवी हासडली. लोकमतने हे वाक्य जसेच्या तसे उचलले. त्यावर या वाचकाने फोन करून लोकमतचे अभिनंदन केले.