मोबाईल ग्राहकात फसवणूकीची भावना | आगळं! वेगळं !!!

मोबाईल ग्राहकात फसवणूकीची भावना

मोबाईल कंपन्यांनी सुमारे पाच वर्षापूर्वी ९९५ रुपयांत लाईफटाईम योजना जाहीर केली तेव्हा दरमहा रिचार्ज करायला कंटाळलेल्या अथवा दरमहा तितका वापर नसल्याने जबरदस्तीने रिचार्ज करून आपला बॅलन्स अधिकच फुगवायला नाऊत्सुक असलेल्या असंख्य ग्राहकांनी त्यावेळी अक्षरशः हजार हजार रुपयांनी आपले खिसे खाली केले आणि या मोबाईल कंपन्यांच्या तिजोऱ्या भरल्या.

त्यावेळी मोबाईल कंपन्यांनी भविष्यातील प्रत्येक रिचार्जवर फुल टॉकटाईम देण्याचे आश्वासन दिले होते. पण या मोबाईल कंपन्या ते आश्वासन सोयीस्करपणे विसरून गेल्या आहेत.आज तर या मोबाईल कंपन्या ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी सिमकार्ड चक्क फुकट वाटत आहेत. तसेच नविन ग्राहकांना अधिक आकर्षक योजना देऊ करत आहेत.

हे सर्व संतापजनक आहे. हजारो रुपयांना नागवल्या गेलेल्या ग्राहकांना सापत्न भावनेने वागणूक दिली जात आहे. फुकटात ग्राहक झालेल्यांना अधिक लाभ आणि जुन्या ग्राहकांना त्यांच्यापेक्षा काहीच वेगळा फायदा नाही.यामुळे अशा पूर्वीच्या मोबाईल ग्राहकात या मोबाईल कंपन्याविषयी फसवणूकीची भावना निर्माण झाली आहे. आपण मूर्खात निघाल्याची खंत त्यांच्या मनात कुठेतरी आहे. पण या मोबाईल कंपन्या केवळ अशा ग्राहकांच्या असंघटितपणाचा फायदा उचलत आहेत, व त्यांची मनमानी करत आहेत.

अशा जुन्या ग्राहकात वाढीस लागलेली ही भावना संपवायची असेल तर या कंपन्यांनी त्या ग्राहकांना पूर्वी कबूल केल्याप्रमाणे सर्व रिचार्जवर फुल टॉकटाईम तसेच दरमहा अधिक काही आकर्षक सवलतींचा फायदा देणे गरजेचे आहे.असंघटित ग्राहकांनीही संघटीतपणे आपल्या हक्काच्या मागण्या लावून धरणे ही काळाची गरज आहे.

0 Comments:

Post a Comment